Sunday, 13 July 2025

 📓 *रमाई ह्या सिध्दार्थ तलवारे संपादीत काव्यसंग्रहाने रमाईच्या त्याग - समर्पण - प्रेम - मैत्री - करुणा - दारिद्री जीवन संघर्ष - नैतिकता आणि आदर्श स्त्री व्यक्तिमत्वाचा जगाला परिचय दिला !*

       *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य''* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान महु म.प्र.

बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


               *"रमाई"* ह्या काव्यसंग्रहाचे संपादक आयु. *सिध्दार्थ तलवारे* हे ब-याच काळापासुन माझ्या संपर्कात आहेत. त्यांचे माझे व्हाट्सअप मिडियावर नियमित विचार आदान प्रदान होत असते. कधी कधी मोबाईलवर आमचे संभाषण होत असते. आयु *सिध्दार्थ तलवारे* हे माझ्या लिखाणाचे नियमित वाचक आहेत. आमच्या ह्या नेहमीच्या बोलण्यातुनचं सिध्दार्थ तलवारे ह्यांनी *"रमाई"* संपादीत काव्यसंग्रहाचा विषय काढला. आणि सदर संपादीत काव्यसंग्रहाची एक प्रत त्यांनी मला पोस्टाने पाठविली. *रमाई ह्यांच्यावर माझी कविता मिडियात आलेली आहे.* बाबासाहेब आंबेडकर वाचतांना *"रमाई आईचे जीवन - संघर्ष - त्याग - समर्पण - प्रेम - मैत्री - करुणा - स्त्री आदर्श"* सहजपणे बोध होवुन जातो. रमाई आईच्या ह्याचं वेदना पुढे *"क्षय रोगाला"* कारणीभूत झाल्या. रमाई ह्या बाबासाहेबांना सोडून गेल्यात. बाबासाहेब हे पुर्णत: खचलेले होते. माझ्या मुंबई प्रवासात मला बाबासाहेबांच्या जुन्या आणि नविन घराला भेट देण्याचा मोह हा आवरता आला नाही. घर प्रपंच सांभाळतांना पोयबाबडीला काळोखातचं जाणे / डोक्यावर सरपण आणने / गोव-या थापणे - त्या बाजारात विकायला घेवुन जाणे / बाळाच्या मृत्युची बातमी बाबासाहेब हे विदेशात शिक्षण घेत असल्याने - त्यांच्या शिक्षणामध्ये व्यत्यय होवु नये म्हणुन सदर बातमी ही लपवुन ठेवणे / बाबासाहेब विदेशातुन शिक्षण घेवून आल्यावर आपल्याकडे घालायला नविन लुगडेचं नाही म्हणुन बहाणा करुन सत्काराला सोबत न जाणे - आणि बाबासाहेब गेल्यावर *छत्रपती शाहु महाराजांनी* दिलेला फेटा लुगडे समान गुंडाळून दुरुनचं बाबासाहेबांचा कार्यक्रम बघणे / बाळाचा मृत्यु झाल्यावर *"कफनाला बाबासाहेब ह्यांच्या खिशात पैसे नाहीत"* ही स्पष्ट जाणिव असल्याने आपल्या *लुगड्याचा पदर फाडुन* बाळाचा अंत्यसंस्कार करण्याची सुचना देणे / *बाबासाहेबांना कधी त्रास होईल* अशी रमाई कधी वागलीचं नाही / घरच्या दारिद्रीचे भांडवल केलेले नाही - बाबासाहेबांची अब्रु ही जाईल असे वर्तन केले नाही / बाबासाहेब हे *अभ्यासात - लिखाणात* गर्क असतांना - जेवण थंड झालेले असतांना - रमाई हिने कामात व्यत्यय केलेला नाही - बाबासाहेबांना जपत होती - रमाईचे खरे प्रेम असे होते. *"रमाई ही प्रेम आदर्श होती. ती मैत्री आदर्श होती. ती करुणा आदर्श ही होती. अशिक्षीत रमाई प्रज्ञा आदर्श होती."* आजु बाजुच्या बायांचे कटु टोमणे सहन करणे इत्यादी इत्यादी .... रमाईच्या वाट्याला आले होते. *"रमाई आईच्या जीवनातील खरे पैलु सहजपणे बोध होतात."* रमाई आई वाचतांना अक्षरशः आपल्या *"डोळ्यातील आसवांच्या अश्रू धारा"* ह्या सहजपणे बाहेर पडत असतात. रमाई आईच्या भावनांचा बोध करणारा *"रमाई"* हा कवितासंग्रह आहे. बाबासाहेबांनी रमाईला *"पंढरपूर"* जाण्यास मज्जाव केला. तुझ्या करिता *"नविन पंढरी"* बनविलं हे ते बोलुन गेले. रमाई ही तेव्हा गप्प होती. रमाई आई हेकड वागलेली नाही. घरचा तमाशा केला नाही. त्रागा ही केला नाही. हा विषय संस्कारांचा भाग आहे. रमाई ही *"संस्कार असलेली महामाता"* होती. डॉ बाबासाहेबांनी ही रमाईला दिलेला आपला तो शब्द पाळला. *"दीक्षाभूमी"* ही नविन पंढरीचं बाबासाहेबांनी निर्माण केली. परंतु हे सर्व सुख बघायला रमाई आईसाहेब मात्र जीवंत नव्हत्या. *"राजगृह"* ह्या बंगल्याचे जीवन सुख आईसाहेब पुर्णतः घेवु शकलेल्या नाहीत. म्हणुनचं *"रमाई"* हा काव्यसंग्रह मला फार महत्वाचा वाटतो. अत: संपादक *सिध्दार्थ तलवारे* ह्यांचे अभिनंदन हे करायलाचं हवे.

           *"रमाई"* ह्या प्रतिनिधीक काव्यसंग्रहातील प्रत्येक कवितेची *"अलग अलग समिक्षा"* करणे हे शब्दमर्यादा बंधनामुळे शक्यचं होणार नाही. समिक्षा ही सार रुपातचं करावी लागणार आहे. परंतु *समस्त कवि - साहित्यिक वर्गांनी* बुध्द - आंबेडकरी साहित्याला *"नकार आणि विद्रोह"* ह्या सिमितचं बांधले गेले असल्यामुळे *"बुध्द - आंबेडकरी साहित्याची व्यापकता"* सांगणे गरजेचे आहे. बुध्द साहित्यातील *"सौंदर्यशास्त्र / मानवशास्त्र / नैतिकशास्त्र / दर्शनशास्त्र / प्रेम"* इत्यादी भाव समजुन घेणे गरजेचे आहे. बाबासाहेब डॉ आंबेडकर ह्यांनी बुध्दाचे बोट पकडले आहे. आणि *"बाबासाहेबांनी आपल्या लिखाणाला तो स्पर्श ही दिला आहे. "* तेव्हा आंबेडकरी साहित्याला आपल्याला ती धार द्यावी लागणार आहे. पुर्व पार लिहिले जात आलेल्या बुद्ध - आंबेडकरी साहित्यामध्ये बदलाव होणे गरजेचे आहे. *"महत्वाचे म्हणजे समस्त लिपी - भाषा साहित्य ह्याचा उगम बुध्द विचारातुन झालेला आहे."* सिंधु घाटी सभ्यता ही पहिल्या बुध्दाचा बोध करुन देते. *"सिंधी घाटी लिपी"* ही तर वाचली - समजली - उमगली गेलेली नाही. परंतु *"धम्म लिपी"* (ब्राम्ही)/ *"पाली भाषा"* ही वाचली /समजली / उमगली गेलेली आहे. ह्या विषयावरील चर्चेचे *"माझे लिखाण"* मिडियामध्ये उपलब्ध असल्याने हा विषय बाजुला सारु या ! *"रमाई"* ह्या काव्यसंग्रहातील उपरोक्त काही भाव बाजुला सारता काही *"कविता शब्द"* रमाईच्या भावनांना वाट मोकळी करुन देतांना आढळतात.

            *"रमाई"* ह्या काव्यसंग्रहामध्ये आमचा मित्र *अनिल सुर्या* रमाईची करुणा सांगताना म्हणतो - *"शब्दालये संपली रमाई / तुझ्या करुणेपुढे / सहनशीलताही धन्य झाली / तुझ्या यातनेपुढे."* रमाई आईच्या यातना हा सहज विषय नाही. *किशोर घोरपडे* रमाईचे मोठा त्याग सांगताना म्हणतो - *"कोटी कोटी लेकरासाठी / धरतीनं सोसावा तसा तु सोसलास सोस / आमच्या जिवनाच्या फुलबागा फुलविण्यासाठी / आई रमाई...."* रमाई ही क्षय रोगातुन बाबासाहेब आंबेडकरांना सोडून गेली. तेव्हा *कुमुदिनी वैद्य* ही तिच्या कवितेत म्हणते - *"उंबरठ्याच्या आत / चार भिंतींच्या कोंदणात / राहुन दिली ही साथ / बाबासाहेबांना ..."* रमाई आईच्या गोव-या वेचण्यावर *कुसुम गांगुर्डे* ही म्हणते - *"रमाई माते / गोळा केल्यास गं शेण्या / नाही सांगितल्या / आपल्या दु:खाच्या कहाण्या."* रमाई आईच्या जीवन संघर्षावर *मीनाक्षी मुन* म्हणते - *"वरळी व्हिलेजला पहाटेला / शेणी थापायला जात होतीस / स्वयंपाकाला सरपण हवे / म्हणून काळोख पडल्यावर / पोयबावडी ते दादरपर्यंत / पायी जावुन काळोखातचं / डोक्यावर सरपण घेऊन यायचीस."* बाबासाहेब ह्यांनी तर *"थाट्स ऑन पाकिस्तान "* हा ग्रंथ रमाई आईला अर्पण केला. ह्यावर *चंद्रहास गमरे* हा त्याच्या कवितेत म्हणतो - *"रमाई / लिहुन ठेवलयं तुझे नाव / मोठ्या सुरेख अक्षरांनी / भीमांनी, साश्रु नयनांनी / पाकिस्तानच्या बुकात."* रमाई आईचे मोठेपण सांगताना *प्र. श्री. नेरुरकर* म्हणतात - *"रमाई / आईनंतर एवढं सुंदर नाव मी ऐकलं नव्हतं / तुम्हाला पाहिलं नव्हतं / तुम्हाला मी ऐकलं नव्हतं / माय तुमच्याबद्दल जेव्हा मी ऐकलं नि वाचलं / तेव्हा माझं काळीज गलबलून गेलं."* रमाई हिच्या बाबासाहेबांच्या प्रेमावर *डॉ राजेंद्र गोणारकर* लिहितो - *"तू जपलसं सूर्याला / सावली होऊन / अन् आरपार / जळत गेलीस."* रमाईच्या त्याग - समर्पण ह्या संदर्भात *दि. रा. वाघमारे* लिहितो - *"पेटलेले मरण हातात घेऊन / पिढ्यान पिढ्यांपासून / आक्रस्ताळेपणाने वावरणा-या संस्कृतीत तूच एक वादळ वेल / ठरलीस इथे !"* रमाईच्या संकटाला सामोरा जाण्यावर *दिगंबर झाल्टे* लिहितो - *"नद्या सागर थांबतात काही / पण / तू तर रमाई... / झंझावातातही थांबली नाहीस."* रमाईच्या खस्ता जीवनावर *नामदेव ढसाळ* लिहितो - *"तुझे चरित्र तुझ्या खस्ता / तुझे अश्रु तुझे उसासे तुझे शहाणपण / तुझ्या डोळ्यातले आदी अंताला स्पर्श करणारे कारुण्य."* रमाईच्या बाबासाहेब जडणघडणीवर *प्रा अशोक नाईक* म्हणतो - *"तुझा असीम त्याग / हिमालयाहुन उंच म्हणून / तू जागवू शकलीस / या मातीतला प्रज्ञा सूर्य."* डॉक्टर बाबासाहेबांच्या सत्कारा प्रसंगी रमाईकडे नविन लुगडे नव्हते. सदर प्रसंगावर *दामोदर मोरे* हे लिहितात - *"मी कसा विसरु / तेव्हाची तुझ्या डोळ्यातील वेदना ? / शाहु महाराजांनी बाबांना सन्मानाने दिलेला / जारी पटकाच नेसून गेलीस."* रमाई आईच्या कष्ट संदर्भात *प्रा. देवेंद्र खंडारे* म्हणतो - *"चुलीतल्या कांड्यांच्या धूर / ओल्या डोळ्यांनी फुंकत फुंकत / आयुष्याच्या तव्यावर / जळती भाकर होऊनच तू पोळलीस."* रमाईच्या निर्वाणातील बाबासाहेबांच्या भावनांना *प्रा. भगवान भोईर* हा शब्दबध्द करतो - *"तू तर शेवटच्या यात्रेला निघालीस / रामी, थोडा वेळ थांबना ! / ह्या दलित झोपड्या प्रकाशमान करुन ! / मग एकाच वेळी जगाचा निरोप घेऊ !"* रमाई आईचे मोठेपण इतके आहे की शब्दांनाही जागा नाही. बाबासाहेब रमाई आईला *"रामु"* ह्या प्रेम शब्दांचा प्रयोग करीत असत. अर्थात बाबासाहेब ह्यांचे सदर प्रेम संदर्भ ही आम्हाला समजुन घेणे गरजेचे आहे.

              आमचे मित्र स्मृतीशेष *योगेंद्र मेश्राम* ह्यांच्या शब्दात रमाई आहे - *"मातीचं सोनं करणारी / अन् आभाळ छताखाली काटेरी आबाळ सोसणारी / आमची 'आई'."* रमाई आईच्या त्यागाचे वर्णन *बी. बी‌. ईलमकर* हे करतात - *"रमाई / तू आलीस / ह्या भूमीवर / लाव्हा रसांची धग / तुझ्या अश्रूत फुलवीत / धगधगत्या सूर्याची / तेजस्वी ज्योत होऊन..."* विदेशातून रमाईच्या पत्राला डॉ बाबासाहेबांचे उत्तर *बेबीताई कांबळे* हिच्या शब्दामध्ये आहे - *"विलायतेला पत्र गेलं रमाईचं / वाचून डोळे भरले तिच्या भीमाचं / परतून आशय असा धाडला / म्हणून पत्र धाडतो रमा मी तुला / शील सत्य नीतीची रमा तू खाण / तुझ्यामुळे जिवंत आहे गं मान."* बाबासाहेब - रमाई ह्यांची असलेली पत्रे ही प्रेम - मैत्रीचा बंध आहेत. म्हणूनच *रमाकांत जाधव* हे त्यांच्या कवितेत लिहितात - *"तुझं अस्तित्व सावलीचं / मायेच्या माउलीचं."* डॉ बाबासाहेब ह्यांना धीर देतांना रमाई ही *रमेशचंद्र सोमकुवर* ह्यांच्या शब्दात म्हणते - *"साहेब, काळजी करु नका / संसाराचा गाडा खेचण्यास मी एकटी समर्थ आहे / वेळ आल्यास गोव-या वेचीन शरम करणार नाही / पण / तुम्ही अंगिकारलेले कार्य तडीस न्या."* रमाई हिच्या त्यागाचे वर्णन *सिध्दार्थ तलवारे* ह्यांच्या शब्दामध्ये - *"तू दीड रुपयाच्या बांधूनी पुड्या / चालविलास संसार / पण कधी केली ना बाबाकडे तक्रार."* सदर *"रमाई"* काव्यसंग्रहात ५४ कविंनी *"रमाई आईवर"* शब्द सुमने वाहिलेली आहेत. इहवादी साहित्यिक (बुद्ध - आंबेडकरी साहित्यिक नाही) *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांना ही प्रस्तावना लिहिण्याचे औचित्य मिळाल्याने रमाई आईचा मोठेपणा प्रा मनोहर यांना कळला. आणि रमाई हिच्यावर कविता लिहिलेली नाही असे पत्र प्रा. मनोहर ह्यांनी संपादक *सिध्दार्थ तलवारे* ह्यांना पाठविले. *"रमाई"* ह्या सिध्दार्थ तलवारे संपादीत काव्यसंग्रहाने *प्रा. डॉ. यशवंत मनोहर* ह्यांना *"रमाई"* कांदबरी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. *प्रा यशवंत मनोहर* ह्यांनी पहिल्या दोन आवृत्तीत कविमित्र *सिध्दार्थ तलवारे* ह्यांचा उल्लेख ही केला आहे. परंतु *प्रा डॉ मनोहर* ह्यांनी नंतरच्या मराठी - हिन्दी आवृत्तीतुन *सिध्दार्थ तलवारे* ह्यांच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. अर्थात *"प्रा डॉ यशवंत मनोहर ह्यांनी ही नैतिकता कां ओलांडली ?"* हा एक संशोधनाचा विषय आहे. *प्रा. यशवंत मनोहर* ह्यांच्या प्रस्तावनेतील *"अर्धांगिनी / महापतिव्रता"* हे शब्द खुप वेदना करुन जातात. तसेच काही कवि वर्गानी सुध्दा *"पतिव्रता / कैवारी / साध्वी / विद्यादेवी / सतीचे वाण / सौभाग्याचं लेण / पुण्यस्मरण / अर्धांगिनी / परमेश्वर / यम विचारांच्या / आत्मा / सवाष्णी / नावाचं कुंकु / दलितांची माउली / पुण्य प्रतापे"* सारख्या केलेला शब्दांचा प्रयोग हा टाळायलाचं हवा. *"रमाई"* ह्या मराठी काव्यसंग्रहाचे *"मुखपृष्ठ / मलपृष्ठ"* साधे आणि सुंदर आहे. सदर मुखपृष्ठ अजुन ही *"छान आणि प्रभावी"* होवु शकते. सदर काव्यसंग्रह प्रकाशन हे *"आदेश प्रकाशन"* ह्यांनी केलेले असुन पुस्तक मुल्य रु. १५० आहे. *सिध्दार्थ तलवारे* ह्यांच्या ह्या प्रयासाला मी मंगलमय भावना देतो आहे.


----------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक १३ जुलै २०२५

No comments:

Post a Comment