✍️ *योगिराज बागुल लिखित दगडी वाडा कांदबरी म्हणजे चिरेबंदी राजवाडा असणारी कादंबरी होय !*
*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'* नागपूर १७
राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर, डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म.प्र.
बुध्द आंबेडकरी लेखक, कवि, समिक्षक, चिंतक
मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२
आंबेडकरी लेखक *योगिराज बागुल* ह्यांनी *"दगडी वाडा "* ही कादंबरी आणि महाकवि - *वामनदादा कर्डक"* ह्यांच्या जीवनचरित्रातील इतिहास *"धूमसता धुमकेतू"* ही दोन पुस्तके मला सस्नेह पाठविली. महाकवि - *वामनदादा कर्डक* ह्यांच्या सोबत *माझी / स्मृतिशेष डॉ रमेशचंद्र डोंगरे* आमची एक बैठक नागपुरातील *"बाबुलखेडा बुद्ध विहारामध्ये"* डॉ. बाबासाहेब आंबेडकर नामांतर प्रकरण संदर्भाने ४० वर्षापुर्वी झालेली आहे. योगिराज बागुल लिखित *"दगडी वाडा"* ह्या कादंबरीला *"चिरेबंदी"* हा शब्द प्रयोग तसे बघावे तर प्रश्नचिन्ह लावणारा आहे. कारण *"दगडी वाडा"* ह्या कादंबरीत सामुहिक दरोडा पडणे / सामुहिक बलात्कार होणे / आरोपींना अटक होणे / न्यायालयात खटला चालणे / आरोपींचा तुरूंगवास / प्रेम वियोग / नायिकेचे विधवा होणे अश्या घटनांमध्ये ती कादंबरी फिरत असतांना, ह्या *"दगडी वाडा"* कादंबरीतील ते चिरेबंदीत्व आहे कुठे ? हा प्रश्न सहज निर्माण होतो. आणि ह्या अर्थाने कांदबरीचे चिरेबंदीत्व नाकारले जाणे, हा ज्याचा त्याचा विचारांचा भाग आहे. कादंबरीकार *योगिराज बागुल* ह्यांची *"दगडी वाडा"* ही तर पहिलीच कादंबरी आहे. आणि कादंबरीची रचना करतांना वाचकांना *"वाचण्यासाठी ती बांधुन"* ठेवण्यास / काही भावुक घटनांनी *"डोळ्यांतील आसवांना वाट"* मोकळी करण्यास *योगिराज बागुल* हे सफल झालेले आहेत. सदर कादंबरीत काही प्रसंगाचे अतिशयोक्तीपुर्ण असणे / क्षेत्रीय स्तर मराठी बोलीभाषा - खेडावु भाषा प्रयोगाचे अत्याधिक असणे / देवत्व भाव सादरीकरण / ज्ञानेश्वरी समान काही मान्यवरांच्या ओव्यांचा अत्याधिक प्रयोग / आंबेडकरी - बुद्ध चेतना नसणे इत्यादी ही विषय जरी असले तरी त्यामुळे कांदबरीचा प्रभाव हा कुठेही कमी झालेला नाही. शेतक-यांचे जीवन - संघर्ष / व्यवस्थेकडून पिळवणूक होणे हा विषय कादंबरीकारांनी चांगल्या प्रभावीशाली मांडलेला आहे. तसे बघावे तर *"दगडी वाडा"* ही कादंबरी *"ललित साहित्य"* बोध करणारी दिसुन येते. परंतु कादंबरीकार *योगिराज बागुल* ह्यांनी आपल्या प्रभावी शब्द बांधणीतुन ह्या कादंबरीला *"चिरेबंदी राजवाडा"* स्वरूप दिलेले आहे.
*योगिराज बागुल* लिखित कादंबरी - *"दगडी वाडा"* ह्याचा नायक आहे *रावश्या* उर्फ रावसाहेब किसन असई. रावश्याचे मित्र आहेत - *दीपक / केरु / मधु.* आणि कादंबरीची नायिका आहे - *उजी* उर्फ उज्वला. उज्वलाची बाल मैत्रीण आहे - *मंगल.* आणि खलनायक आहे मुकादम - *गब्रु गोटे.* तसेच कांदबरीत बरीच अशी पात्रे आहेत. कादंबरी ही *"खेड्यातील जीवनमानवर"* आधारित आहे. रावश्या आणि त्याचे दोन मित्र मधु / केरु ही पेढीला म्हसोबाच्या जत्रेला जातात. ती रहाटपाळण्यात बसल्यावर समोरच्या सिटवरील *उज्वला* कडे रावश्याचे लक्ष जाते. पुढे रावश्याचे उज्वला सोबत प्रेम होते. जात ही दोघांमध्ये आडवी येते. उज्वलाचे लग्न हे *वसंता* ह्यांच्या सोबत होते. रावश्या मग गावाच्या रोडवरचंं - *"सविता चहा आणि फराळ केंद्र"* उघडतो. रावश्या ह्याचा हॉटेल धंदा वेग पकडतो. रावश्या - उज्वला ह्यांचा प्रेम-वियोग झालेला असतो. गावात कामाचा दुष्काळ असल्यामुळे गावकरी माणसे दुस-या दुरच्या गावाला ऊस तोडणीला जातात. उज्वला हिचा नवरा *वसंता* हा सुध्दा वडिलांसोबत ऊस तोडणीला जातो. उज्वला हिला गावात अंगणवाडीत शिक्षिकेची नोकरी लागलेली असते. होळीच्या आदल्याचं दिवशी उज्वलाला ट्रेंनिगला जावे लागते. *गब्रु गोटे* आणि टीम ही गावात माणसे नसल्यामुळे होळीच्या दिवशी *"नकाबकोश पांघरुन दरोडा"* घालतात. आणि गावातील म्हातारी पासुन सर्व स्त्रियांवर सामुहिक बलात्कार करतात. उज्वला ही ट्रेनिंग वर असल्यामुळे ह्या बलात्काराची शिकार होत नाही. *उज्वला* ही सहा महिन्यांची गरोदर आहे. सामुहिक बलात्कार आणि दरोडा प्रकरणात *गब्रु गोटे* सह सर्व आरोपींना पकडले जातात. गब्रु गोटे आणि मंडळी हा दरोडा प्लाॉन *रावश्या* ह्याच्या "सविता चहा आणि फराळ केंद्रात" केल्यामुळे *रावश्या* हा सुध्दा आरोपी होतो. आरोपी मंडळी जेलमध्ये जातात. इकडे *वसंता* हा ऊस तोडणी कामावर असतांना, ट्रक्टरवर उस भरणी करतांना ऊसाचा ढिगारा वसंताच्या डोक्यांवर पडतो. वसंता हा गंभिर जखमी होतो. दवाखान्यात भरती करण्यात येते. परंतु डोक्यातील गंभिर जखमेमुळे वसंता हा जगाचा निरोप घेतो. उज्वला ही विधवा झालेली असते. सासुरवाडीच्या विवादातुन उज्वला ही आईवडिलांकडेचं राहायला जाते. उज्वला ही आईच्या घरी लहान मुलीला जन्म देते. *रावश्या* हा पुढे *"बलात्कार - दरोडा आरोपातुन"* सुटतो. *उज्वला - रावश्या* ह्यांची एकदा रस्त्यावर उभी भेट होते. उज्वला हिचे पहिले प्रेम हा *रावश्या* असल्याने ती त्याला विसरत नाही. पुढे रावश्याचा मित्र दिपक हा *उज्वला - रावश्या"* ह्यांचा एक आंतरजातीय विवाह घडवून आणतो. रावश्या ह्याला *"एंटी करप्शन ब्युरो"* ह्या विभागामध्ये नोकरीचा आदेश येतो. अशी एकंदरीत *"दगडी वाडा"* ह्या कादंबरीचे कथानक आहे.
*योगिराज बागुल* ह्यांच्या *"दगडी वाडा"* ह्या कादंबरीचे कथानक वाचकांना बांधुन ठेवण्यास सफल झालेले आहे. कादंबरीचे काही प्रसंग हे अतिशयोक्तीचे वाटतात. *ज्ञानेश्वरी* (?) ओव्या पासुन *"काही संतांच्या अति ओव्या"* प्रयोग / *"देवदर्शन प्रयोग"* हा काही प्रमाणात टाळता ही आला असता. *"बुध्द आंबेडकरी साहित्य"* प्रभावाचा *"दगडी वाडा"* ह्या कांदबरीत कुठेही बोध होत नाही. ही गोष्ट मनाला खलुन जाणारी आहे. *"खेडावु प्रादेशिक भाषेचा"* जास्त प्रयोग झालेला आहे. नायक - नायिका - खलनायक इत्यादी संवाद पात्रातील तो शब्द प्रयोग योग्य ही आहे. परंतु कादंबरीच्या अन्य ठिकाणी तो वापर टाळता ही आला असता. *"खेड्यातील शब्द भाषा"* प्रयोग हा शहरीमय संस्कृतीला सहज समजणे सोपे नाही. *"दगडी वाडा"* ह्या कादंबरीचे मुखपृष्ठ हे कादंबरीच्या विषयाशी खुप निगडीत आहे. *"दगडी वाडा दुभंगलेले"* चित्र खुप काही बोध करुन जातो. *पेरणी प्रकाशन* द्वारा प्रकाशित कादंबरीचे अधिकार *ललिता बागुल* ह्यांच्याकडे राखुन ठेवलेले असुन कादंबरीचे ही पहिलीच आवृत्ती आहे. पुस्तक पेपर दर्जा चांगला आहे. कांदबरी किंंमत रू ३५०/- ही उचित मुल्यचं म्हणायला हवे. कांदबरीकार *योगिराज बागुल* ह्यांच्या ह्या प्रयासाला माझ्या मंगलमय कामना आहेत.
-----------------------------------------
▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*
नागपूर दिनांक २७ जुन २०२५
No comments:
Post a Comment