🛕 *अॅड. प्रकाश आंबेडकर ह्यांचे कोरोना संक्रमणात बंदीस्त मंदिर आंदोलन आणि सामाजिक नैतिकता...???*
* *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर
राष्ट्रीय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल
मो.न. ९३७०९८४१३८, ९८९०५८६८२२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सामाजिक - राजकिय विषय संदर्भात बोलुन गेले की, *"सामाजिक प्रश्न इतका महत्त्वाचा आहे की, त्याला कितीही भिजत पडु दे म्हटले तरी तो प्रश्न दत्त म्हणुन पुढे उभा राहतोच. ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न बाजुस ठेवुन नुसते राजकारण हाती घेतले व इतरास घेण्यास लाविले, त्यांनी काहीच साधले नाही. इतकेच नव्हे तर, सामाजिक प्रश्न बाजुस टाकल्यामुळे त्यांच्या राजकीय ध्येयाची साध्यता त्यांची त्यांनीचं बिकट करुन टाकली, यास आजची परिस्थिती साक्ष देत आहे...!"* (बेळगांव,११ एप्रिल १९२५) डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे राजकारण विषय संदर्भात म्हणतात की, *"केवळ राजकीय प्रगतीने जीवनातील सर्व प्रश्न सुटत नाहीत. जीवनाच्या प्रगतीकरीता ज्या अनेक गोष्टींची गरज आहे; त्यापैकी राजकीय स्वातंत्र्य ही एक आहे. शिक्षण हीच ख-या अर्थाने जीवनाच्या प्रगतीकरीता महत्त्वाची बाब होय...!"* (औरंगाबाद, २१ जानेवारी १९४९) तसेच डॉ. आंबेडकर हे मंदिर संदर्भात म्हणतात की, *"आजपर्यंत आपल्याला हिंदुंच्या देवाचे दर्शन झाले नाही म्हणुन आपण मेलो नाही. किंवा आजपर्यंत हिंदुंच्या देवळात जाणारी गाढवे, कुत्री, मांजरे वगैरे जनावरे माणसे झाली नाहीत. ते आम्हास शिवुन घेत नाहीत तर आम्हीही त्यांना शिवुन घेणार नाही...!"* (निपाणी बेळगाव, २३ मे १९३२) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे उपरोक्त तीन संदर्भ देवुन, मी आता मुख्य विषयाकडे वळतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा सामाजिक - राजकीय - धार्मिक आदी विचार समजण्यास, उपरोक्त तिन संदर्भ आता पुरेसे आहेत. तसे अन्य संदर्भ ही मला देता येतील. प्रश्न इथे आहे, *"अॅड. प्रकाश आंबेडकर ह्यांच्या पंडागिरी (कोरोना संक्रमण काळात हिंदु मंदीर खुले करणे) आंदोलनाचा....!!!"* काय केवळ पंडागिरी आंदोलनातुन रिपब्लिकन चळवळ ही सशक्त होणार आहे...? काय प्रकाश आंबेडकर हे समस्त बौध्द समुह असो, अधर्मांतरीत महार - दलित समुह असो, ह्या समुहाचे ऐकमान्य नेतॄत्व आहे...? आणि जर नसेल तर, प्रकाश आंबेडकर ह्यांनी आपल्या समस्त समुहाने त्यांच्या पाठिशी, संयुक्त उभे राहाण्याकरीता काय कॄती आराखडा केला...? प्रकाश आंबेडकर हे ह्या आपल्या समस्त समुहात एकमान्यता मिळविण्यासाठी कां कमी पडले...? *"समस्त आंबेडकरी चळवळ ( मग ती राजकीय - सामाजिक - धार्मिक असो ) एकसंघ / सशक्त करण्याकरिता अॅड. प्रकाश आंबेडकर ह्यांनी काय योजना केल्या आहेत...?"* आणि जर प्रकाश आंबेडकर ह्यांनी काही योजना केल्या असल्यास, त्या सर्वच्या सर्व योजना, फेल होण्याची प्रमुख कारणे काय...? अॅड. प्रकाश आंबेडकर ह्यांच्या यशाची (?) फलीते आहे काय...? आदी प्रश्नांची उत्तरे ही प्रकाश आंबेडकर ह्यांना आंबेडकरी समाजाला देणे, फार गरजेचे आहे. त्यानंतरचं आपणाला प्रकाश आंबेडकर ह्यांनी अकोला मतदारसंघात उभारलेल्या *"विवादीत पंडागिरी आंदोलनातील यश - अपयश - औचित्यता - नैतिकता"* इत्यादी मुद्यावर सविस्तर चर्चा करता येईल...!
अॅड. प्रकाश आंबेडकर ह्यांना उपरोक्त मी जे प्रश्न केलेले आहेत, त्यापैकी काही प्रश्र *"मी ( डॉ. मिलिन्द जीवने) आणि अॅड. प्रकाश आंबेडकर ह्यांना मी स्वत: सहा सात वर्षांपूर्वी, नागपुरातील रवि भवनात झालेल्या आमच्या भेटीमध्ये"* प्रकाशरावांना केलेले होते. त्या आमच्या भेटीच्या वेळी प्रा. रणजीत मेश्राम, विमलसुर्य चिमणकर, नत्थु नाईक, डॉ मिलिन्द माने (माजी आमदार), राजु लोखंडे, शंकर माणके आणि प्रकाश आंबेडकर ह्यांचे २० - २५ कार्यकर्ते उपस्थित होते. मध्यंतरी *"इंदु मिल प्रकरणातील प्रकाश आंबेडकर ह्यांच्या विवादीत बयाणावर"* माझा लेख बराच गाजला. तसेच *"राजगॄह राष्ट्रीय स्मारक करण्यास प्रकाश आंबेडकर ह्यांनी पुढाकार घ्यावा"* आणि सोबतचं *"आंबेडकर भवन वास्तु उध्वस्तीकरण"* ह्या संदर्भातील माझ्या लेखावर बरीच चर्चा झाली. इथे प्रश्न, प्रकाश आंबेडकर ह्यांच्या प्रामाणिक इच्छा शक्तीचा आहे. धरसोड पणाचाही आहे. कधी कधी मला असेही वाटायला लागते की, प्रकाश आंबेडकर हा अजुनही *"मॅच्युअर्ड राजकिय"* सशक्त नेता झालेला नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वैचारिक सल्लागार मित्रांशी सल्ला मसलत करणे गरजेचे झाले आहे.
*बहुजन समाज पार्टी* (BSP) ह्या दलाच्या सर्वसर्वा *मायावती* ह्यांसुध्दा प्रकाश आंबेडकर ह्यांच्या वाटेने गेलेल्या आहेत. मायावती ह्यांना गणपतीची गरज कां भासली...? हे सुध्दा एक गुढ आहे. मायावती ही सुध्दा सशक्त राजकिय चळवळीतुन, वाहावत जात असतांना ही, अजुन त्यावर आत्मचिंतन न करणे म्हणजे, प्रकाश आंबेडकर असो वा मायावती ह्यांच्या बुध्दीची कीव करावयाशी वाटते. कांशीराम जी ह्यांनी आखलेली *"कॅडेट संकल्पना"* पुढे रेटायला हवी. बामसेफ कर्मचारी संघासोबत मित्रता जोडायला हवी. मी *रामदास आठवले* ह्यांच्या राजकीय विचाराबद्दल बोलणार नाही. कारण तो *"मेंदुहिन गाढव"* आहे...! परंतु मायावती आणि अॅड. प्रकाश आंबेडकर ह्यांनी आपल्या "आंबेडकरी राजकीय नीतिवाद सुत्राची" समिक्षा करणे, फार गरजेचे आहे. *"कारण भविष्यातील आंबेडकरी उज्वल राजनीतिचे ते शिल्पकार होवु शकतात...!"* केवळ ह्या दोघांनी आपसात एकत्र विचार विमर्श करून, काही तरी समझौता करायला हवा. आणि अशा "पंडागिरी आंदोलना" पासुन दुर राहायला हवे. ह्यातच खरे आपल्या राजनीतिच्या यशाचे गमक सापडणार आहे...!!!
* * * * * * * * * * * * * * * * * * * * *
No comments:
Post a Comment