Saturday 17 July 2021

 ✍️ *डॉ. यशवंत मनोहर ह्यांनी श्रध्दा संदर्भात कोणतीही टिप्पणी करण्यापुर्वी आधी बुध्द विचार समजुन घेणे गरजेचे आहे...!*

  *डॅा. मिलिन्द जीवने 'शाक्य'*, नागपूर १७

  राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल

 मो.न. ९३७०९८४१३८ / ९२२५२२६९२२


      महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने आयोजीत, ई मासिकाच्या नुकत्याच झालेल्या प्रकाशन सोहळ्यात बोलतांना ज्येष्ठ आणि नामवंत दलित साहित्यिक प्रा. डॉ. यशवंत मनोहर म्हणाले की, *"श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात काहीही फरक करता येत नाही. तर्काला मुठमाती दिल्यावर श्रध्दा जन्माला येते. आणि तर्काची हत्या केल्यावर अंधश्रध्दा जन्माला येते. श्रध्दा आणि अंधश्रदा ही तर्क, विज्ञान तसेच बुद्धीप्रामाण्यवादाला मानत नाही. त्यामुळे ह्या दोन्ही एकचं आहेत...!"* सदर भाषणात डॉ. मनोहरांनी श्रध्दा आणि अंधश्रध्दा ह्यामध्ये विशेष भेद करतांना, *"मुठमाती आणि हत्या"* ह्या दोन शब्दांचा केवळ *"शब्दच्छल"* केलेला दिसुन येतो. प्रश्न इथे हा आहे की, *"मुठमाती / हत्या"*  ह्या दोन शब्दांच्या अर्थात मुलभुत फरक काय आहे ? तसे बघता सदर दोनही शब्द, हे समानार्थी असे शब्द आहेत. आणि प्रा. डॉ. मनोहरांनी केलेल्या ह्या शब्दच्छल अर्थामुळे, *"भगवान बुध्दांनी सांगितलेल्या श्रध्दा विचारशीलता ह्या उदात्त भावाला आम्ही कोणत्या अर्थाने बघायला हवे?"*

    *"श्रध्दा"* संदर्भात बुध्द विचारांची चर्चा करण्यापुर्वी प्रा. डॉ. यशवंत मनोहर ह्यांनी लिहिलेल्या साहित्य लिखाणाचे ओझरते समिक्षण होणे, हे अत्यंत आवश्यक आहे. प्रा. डॉ. यशवंत मनोहर हे निश्चितचं ज्येष्ठ, नामांकित तसेच ते केवळ दलित साहित्यिक आहेत. *"त्यांना आंबेडकरी आणि बुध्द विचारधारेचे साहित्यिक असे अजिबात म्हणता येणार नाही...!"* ना ही त्यांचा साहित्य लिखाणात ह्या विषयावर सखोल अभ्यास दिसुन येत आहे. दुसरी गोष्ट अशी की, डॉ. मनोहर ह्यांनी त्यांच्या साहित्य लिखाणात *"कधी मार्क्स सांगितला, तर कधी केशवसुत सांगितला."* आता तर प्रा. डॉ. यशवंत मनोहरांनी अंधश्रध्दा निर्मुलन आयोजकांची फारचं प्रशंसा केलेली आहे. परंतु डॉ. यशवंत मनोहर हे प्रामाणिकपणे आम्हाला सांगु शकतील काय, *"अंधश्रध्दा फोफावण्याचे प्रमुख / मुळ घटक काय आहेत?"* खरे सांगायचे झाल्यास, अंधश्रध्दा पेरण्यास प्रमुख घटक जर कोणता असेल तर, तो प्रमुख घटक म्हणजे-  *"देववाद / धर्मांधवाद...!"*  आम्हाला विशेषत: हे ही अभ्यासावे लागणार आहे की, अंधश्रध्दा मिशन क्षेत्रात कार्यरत मंडळींनी, त्यांच्या कृतीशील भावामध्ये देव आणि धर्मांधता ही नेहमी नाकारली आहे काय? कारण ब-याच अंधश्रध्दा निर्मुलन पदाधिकारी वर्गाने धर्म आणि देव ह्या मुळ कारक विषयाला कधी हात न घालता, मिडियाच्या माध्यमातुन त्यांनी प्रसिध्दी मिळण्याची अनैतिक हवस धरुन, *"अंधश्रध्दा निर्मुलनाचा"* केवळ काळा बाजार मांडलेला दिसुन येतो. आणि आम्हाला हे सुध्दा समजुन घेणे गरजेचे आहे की, *"एखादा कुणी मान्यवर कुण्या एका विद्यापीठातील, कुणा एका विभागाचा विभागाध्यक्ष झाला म्हणजे, तो व्यक्ती फार मोठा विद्वान आहे...!"* हा भ्रम नसावा. मग तो विभाग मराठी विभाग असो किंवा डॉ. आंबेडकर विचारधारा विभाग असो वा अन्य विभाग. कारण प्राध्यापकी पेशा नसणा-या, ब-याच मान्यवरांचे लिखाण आणि ज्ञान, हे सदर मान्यवरांपेक्षा फारचं सरस असलेले दिसुन येते...! ह्या ठिकाणी कुण्या प्राध्यापक मान्यवरांचे वैचारिक हनन करण्याचा माझा उद्देश नसुन, अलिकडे ही जी विशेष प्रवृत्ती बोकाळलेली आहे, त्याला उत्तर म्हणुन हे माझे प्रयोजन होय. गैरसमज नसावा. आणि मी प्राध्यापक मान्यवरांचा फार आदर ही करतो. कारण ते विद्यार्थ्यांच्या जडण - घडणीचे खरे शिल्पकार आहेत.

     आता *"श्रध्दा"* ह्या विषयावर चर्चा करु या. *सुत्तनिपात* ग्रंथामध्ये *"कसिभारद्वाज सुत्त"* ह्यातील बुध्द आणि कसिभारद्वाज शेतकरी ह्यांच्या संभाषणाकडे मी आपले लक्ष केंद्रीत करतो. प्राचिन मगध देशातील दक्षिणगिरी प्रांतातील एकनाळा गावातील ही घटना. कसिभारद्वाज नावाचा एक शेतकरी हा आपल्या शेतात ५०० नांगर चालवुन पिकांची पेरणी करीत होता. अगदी त्यावेळी तथागत हे भिक्षाटनाकरिता जात होते. तेव्हा कसिभारद्वाज नावाचा ब्राम्हण भगवान बुध्दाला म्हणाला, *"हे श्रमण, मी नांगरतो, पेरतो आणि माझा उदारनिर्वाह करीत असतो. त्याप्रमाणें तु सुध्दा शेती करुन उदारनिर्वाह कर. भिक्षा मागण्यात काय अर्थ आहे."*  त्याला उत्तर देतांना बुध्द एक गाथा म्हणतात -

"सध्दा बिजं तपो वुट्ठि, पञ्ञा मे |

हिरि ईसा मनो योत्तं, सति मे फालपाचनं ||

कायगुत्तो वचिगुत्तो, आहारे उदरे यतो | 

सच्चं करोति निद्दानं, सोरच्चं मे पमोचनं ||

विरिय मे धुरधोरय्हं, योगख्खेमाधिवाहनं |

गच्छति अनिवत्तन्त, यत्थ गन्त्वान सोचति ||"

* अर्थ : - *श्रध्दा हे माझे बी आहे. तपश्चर्या ही वृष्टी, प्रज्ञा हा जु आणि नांगर, पाप - लज्जा हा इसाड, चित्त ही दोरी, आणि स्मृती (जागृती) हा फाळ व चाबुक आहे. काय आणि वाचेचे मी सरंक्षण करतो. उदार-निर्वाहाच्या आहारात मी संयमित असतो. सत्य हे माझे निंदण आहे. आणि संतोष ही माझी सुट्टी आहे. तसेच धुरा वाहणारा माझा उत्साह योगक्षेमाभिमुख (निर्वाणाभिमुख) जातो व तेथे गेल्यावर तो परत येत नाही. तो शोकरहित होतो.*

     तसेच *"बुध्द साहित्या"* मध्ये *"श्रध्दा"* संदर्भात अजुन काही गाथा आहेत -

"सध्दा बन्धति पाथेयं |" (सयुंक्त निकाय)

* अर्थ :- *श्रध्दा ह्या गुणामुळे आपसुकचं दुसरे ही गुण हे सोबत येत असतात.*

"सध्दा साधु पतिट्ठिता |" (संयुक्त निकाय)

* अर्थ :- *सुप्रतिष्ठित अशी श्रध्दा ही फार कल्याणकारी आहे.*

" सुखा सध्दा पतिट्ठिता |" (धम्मपद/ना.वग्ग)

* अर्थ :- *स्थिर श्रध्दा ही सुखकारक आहे.*

"सध्दा वित्तं पुरिसस्स सेट्ठं |" (सं. निकाय)

* अर्थ :- *श्रध्दा ह्या लोका (संसार) त पुरुषाचे श्रेष्ठ धन आहे.*

* सध्दा दुतिया पुरिस्स होति | (सं. निकाय)

* अर्थ :- *श्रध्दा हेच दुसरे (मित्र) पुरुषचं आहे.*

* पामोज्जबहुलो भिक्खु पसन्नो बुध्दसासने |

अधिगच्छे पदं सन्तं सख्ङारुपसमं सुखं ||

(धम्मपद)

* अर्थ :- *बुध्द शासनावर श्रध्दा ठेवणारा, प्रसन्नोचित भिक्खु हा सर्व संस्काराचे उपशमन करुन सुखस्वरुप शांत पदाला प्राप्त होतो.*

* सध्दो सीलेन सम्पन्नो यसोभोगसमप्पितो |

यं यं पदेसं भजति तत्थ तत्थेव पुजितो || (धम्मपद)

* अर्थ :- *श्रद्धावान, शीलवान, यशस्वी, सम्पन्न व्यक्ती हा जिथे जिथे जातो, तेव्हा तेव्हा तो सत्कार प्राप्त करतो.*

    बुध्द साहित्य असो की बुध्द कृतीशील भाव असो, त्यामध्ये *"श्रध्दा"* ह्या भावाला अनन्य साधारण महत्व आहे. आणि आता महत्वपुर्ण प्रश्न असा की, *"भगवान बुध्द ह्यांना अभिप्रेत असणारी अशी श्रध्दा कोणती ? "* भगवान बुध्दाला *"प्रज्ञायुक्त श्रध्दा"* अभिप्रेत आहे. प्रज्ञा म्हणजे विशुध्द असे ज्ञान. प्रज्ञेमुळे व्यक्ती हा परिशुध्द होत असतो. प्रज्ञापुर्वक आचरण करणा-यांचे जीवन हे श्रेष्ठ मानले जाते. प्रज्ञेचे श्रृतीमयी, चिंतनमयी आणि भावनामयी हे तिन प्रकार आहेत. प्रज्ञेच्या ह्या तिन प्रकारावर सविस्तर चर्चा पुढे कधी तरी करु या. *"श्रध्दा"* ह्या उदात्त भावाचा संदर्भ देवुन (जरी श्रध्दा ह्या शब्दाचा उल्लेख नसला तरी) *"बुध्द वचन"* देवुन, ह्या लेखाला विराम देतो. माणसांच्या असणा-या *"समस्यांचे निवारण"* करण्या संदर्भात बुध्दाला प्रश्न विचारण्यात आला.

"अन्तो जटा बहि जटा, जटाय जटिता पजा |

तं तं गोतं च पुच्छामि, को इमं विजटये जटं ||"  (विशुध्दीमग्ग)

* अर्थ :- *ह्या संसारात अंतर्गत आणि  बहिर्गत अश्या समस्यांचे निवारण कोण करु शकतो..?*

     ह्या प्रश्नाला उत्तर देत असतांना तथागत बुध्द म्हणतात - *(कारण ह्यामध्ये श्रध्देचा भाव दिसुन येतो.)*

"सीले पतिट्ठायो, नरो सम्पञ्ञो चित्तं पञ्ञंच भावयं |

आतापि निपको भिक्खु , सो इमं विजटयं जटं ||"   (विशुध्दीमग्ग)

* अर्थ :- *जो व्यक्ती शीलावर प्रतिष्ठीत होतो, संपन्नशील आहे, जो चित्त आणि प्रज्ञेची भावना करतो, असा उद्दोगशील भिक्खु हा त्या सर्व समस्यांचे (संसाराचे / लोकांचे) निवारण करु शकतो...!*


* * * * * * * * * * * * * * * * * * *

No comments:

Post a Comment