Friday, 31 January 2025

 👌 *प्रज्ञेची क्रांतीस्थळे ही पुस्तक राजकुमार वंजारी ह्यांच्या प्रयासातील साध्या व सोप्या भाषेतील आंबेडकरी धम्म खजीना !*

        *डॉ मिलिन्द जीवने 'शाक्य',* नागपूर १७

राष्ट्रिय अध्यक्ष, सिव्हिल राईट्स प्रोटेक्शन सेल 

एक्स व्हिजिटिंग प्रोफेसर डॉ बी आर आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ महु म प्र 

मो. न. ९३७०९८४१३८, ९२२५२२६९२२


        दोन तिन दिवसांपुर्वी *राजकुमार वंजारी* हा आंबेडकरी कार्यकर्ता हरिदास बेलेकर समवेत माझ्याकडे आला. बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवन संघर्षामध्ये आई रमाई ही सतत बाबासाहेब ह्यांच्या सोबत केवळ उभी राहिलेली नसुन बाबांना ती धीरता देणारी असल्यामुळे, दीक्षाभूमी नागपूर ते रत्नागिरी जिल्ह्यातील वणंद (रमाई आईची जन्मभूमी) पर्यंत अशी लांब प्रवास यात्रा काढली गेली होती. *आई रमाईचे कष्ट - त्याग - प्रेम - समर्पण - वेदना - दु:ख हे सर्व काही शब्दामध्ये मांडणे इतके सहज असा विषय नाही.* कारण प्रत्यक्ष अनुभुतीचा अनुभव काही मनातील भावना ह्या मनातचं बंदिस्त ठेवीत असतात. आई रमाईचा जीवन इतिहास वाचतांना डोळ्यातील आसवांना मोकळी वाट करुन द्यावी लागत असते. तेव्हा आसवांची धारा ही थांबणारी नसते. म्हणुन आई रमाई ही आदर्श पत्नी - आदर्श आई - आदर्श स्त्रीत्वाचे प्रतिक आहे. राजकुमार वंजारी हा तर आंबेडकरी साहित्य लिखाणाचा घटकचं नाही. तो आंबेडकरी सक्रिय चळवळीतील ध्येयवेडा आहे. मनपा नागपूर येथे वर्ग ४ श्रेणीतील नोकरी करुन राजकुमार आपली सामाजिक बांधिलकी जोपासतो आहे. आणि त्या सामाजिक बांधिलकी फलित म्हणजे *"प्रज्ञेची क्रांती स्थळे"* ही पुस्तक होय.

        राजकुमार वंजारी ह्या अश्या ध्येयवेड्या आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आई रमाई मिशनमध्ये झोकुन दिल्यानंतर, मग तो बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या समस्त जीवन निगडित स्थळांना काही लोकांना सोबत घेवुन भेटी द्यायला लागलेला दिसुन येतो. आणि हा कटु अनुभव राजकुमार वंजारी ह्याला लिखाण करण्यास प्रेरणा देणारा ठरला. *"प्रज्ञेची क्रांती स्थळे"* ह्या पुस्तकातील भाषा ही उच्च दर्जाचे साहित्य लिखाण नसली तरी, सदर पुस्तकातील साधी - सोपी भाषा ही समस्त पुस्तक वाचण्याला थांबवित नाही. सदर पुस्तकात बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे जन्मस्थान महु, बालपण निवास दापोली, मुळगाव आंबडवे, प्राथमिक शाळा सातारा, परळ मुंबई निवास, भिमाई समाधी स्थळ सातारा, सिध्दार्थ कॉलेज, माणगाव परिषद, भीमा कोरेगाव विजय स्तंभ, चवदार तळे आणि मनुस्मृती दहन स्थळ महाड, काळाराम मंदिर नासिक, राजगृह दादर, धर्मांतर घोषणा क्रांती स्थल येवला, लांडोर बंगला धुळे, तळेगाव दाभाडे बंगला, मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद, बाबांचा पहिला पुतळा कोल्हापूर, पहिले बुध्द विहार देहु रोड, दीक्षाभूमी नागपूर, दीक्षाभूमी चंद्रपूर, चैत्यभूमी मुंबई, भीमाई जन्मभुमी आंबेटेभे, रमाई जन्मभूमी वणंद, रमाई समाधी मुंबई, महात्मा फुले वाडा पुणे, मुलींची पहिली शाळा पुणे, नामांतर स्मारक नागपूर समान तमाम क्रांती स्थळांची माहिती संकलित करुन पुस्तक रुपाने प्रकाशीत केली आहे. राजकुमार ह्यांचे हे कार्य खुप प्रशंसनीय म्हणायला हवे. प्रत्येक आंबेडकरी बांधिलकी जोपासणा-या व्यक्तींनी ही पुस्तक वाचायलाचं हवे. सदर पुस्तक हे समस्त आंबेडकरी स्थळांची ओळख देणारे *"आंबेडकरी धम्म खजाना"* आहे, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती होणार नाही. पुस्तकाचा पेपर दर्जा हा फार उच्च प्रतीचा आहे. राजकुमार वंजारी ह्याच्या ह्या प्रयासाला मी माझ्या मंगल कामना देतो.


----------------------------------------

नागपूर, दिनांक ३१ जानेवारी २०२५

No comments:

Post a Comment