Wednesday, 24 June 2026

 🧜‍♂️ *हे विशाखा मिगार माते....!!!*

      *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

      मो.न. ९३७०९८४१३८


हे विशाखा मिगार माते

तुला मानवी नैतिक संस्कार 

अंग देश भद्दीय नगर व्यापारी 

तुझे पिता धनजय सेठ ह्यांच्याकडुन

जन्मजात मिळाले होते गं

तुझ्या पित्याने तुझा विवाह

श्रावस्ती धनवान सेठ निगण्ठ उपासक

मिगार पुत्र पुण्यवर्धन 

ह्याचे सोबत करुन दिल्यानंतर

तुला घरातुन निरोप देतांना

तुझ्या जन्मजात पित्यांनी

दहा गोष्टीची जाण करुन दिलेली होती

घरातील अग्नी बाहेर जावु न देणे

बाहेरचा अग्नी घरात येऊ न देणे

अग्नी अर्थात गृह गुपिते, भांडणे, विवाद

जो परत करणार असेल त्याला काही देणे

जो परत करणार नसेल त्याला न देणे

जो देईल त्याला देणे

जो ना देईल त्यालाही देणे

प्रसन्न चित्त बसणे

प्रसन्न चित्त खाणे पिणे

अग्नी प्रज्वलित राहील काळजी घेणे

येथे अग्नी अर्थात गृह प्रकाश होय

गृहदेवतांचा आदर सत्कार करणे

आणि तु सासुरवाडी श्रावस्ती येथे

नव्याने वास्तव्यास आली असतांना

नग्न निगण्ठ स्वागतास विरोध केल्याने

सासरे निगण्ठ उपासक मिगार

ह्यांच्या क्रोधाला सामोरा गेली होतीस

तुझे पिता सेठ धनंजय माता सुमना

सम्राट प्रसेनजीत ह्यांच्या विनंतीवर

सम्राट बिंबिसार ह्यांच्या आज्ञेवर 

कोशल देश साकेत नगर येथे

स्थानंतरीत झालेले होते

आणि तु सुध्दा पिता धनंजय सोबत

साकेत अर्थात अयोध्या येथे

तुझ्या विवाहाच्या आधी

गर्भ श्रीमंतीत वास्तव्यास होतीस

विवाहानंतर ही श्रीमंती कायम होती ....

तुझे सासरे मिगार हे नग्न निगण्ठ उपासक

आणि तु तर तथागत बुध्द उपासक

दोन परस्पर विरोधी विचार दिशा

मग वैचारिक विवाद हा असणारचं

तुझे सासरे भोजन करीत असतांना

एक बौध्द भिक्खु भिक्षाटनास घरी आला

तुझ्या सास-यांनी बुध्द भिक्खुकडे 

पुर्णत: दुर्लक्ष केलेले होते

तेव्हा तु भंतेना म्हणाली होतीसं

भंते कृपया तुम्ही पुढे जा

तुझे सासरे शिळे अन्न खात आहेत

तेव्हा विशाखाचे हे शब्द ऐकूण

तुझे सासरे तुला माहेरी साकेत नगरीला

सोडण्यास फर्माण सोडून देतात

तेव्हा तु पिता नियुक्त आठ पंचासमोर 

आपले निदोर्षत्व सिध्द करण्याची मागणी

आपल्या सासरच्यांना केली होतीस

तेव्हा तुझ्या कुशाग्र बुध्दीतुन

आठ पंचानी तुला निर्दोष निर्णय दिल्यावर

आपल्या माहेरी जाण्याचा तुझा निर्णय

तुझ्या सासरच्यांना दिला होता

सासरच्यांना त्यांची चुक लक्षात आली

तेव्हा तुझ्या सासरच्यांनी मागितलेली माफी

आणि तुझे सासरे मिगार ह्यांनी

पुढे बुध्द उपदेश ऐकुण

बुध्दाचे पुर्णत: उपासक होवुन

तुझे सासरे मिगार ह्यांनी

तु पुत्रवधु असतांनाही 

तुला मातेचा दर्जा दिला असल्याने

तु विशाखा मिगार माता म्हणुन

सर्वदुर परिचीत झाली होतीस

आणि हा तुझा इतिहास आहे ....

हे विशाखा मिगार माते

तथागत बुध्द ह्यांच्याकडुन सुध्दा

तु आठ वर मागुन घेलेलेले होते

पावसाळ्यात भिक्खु संघाला चिवर दान

विहारात दाखल होणा-या भिक्खुंना भोजन

विहारातुन बाहेर जाणा-या भिक्खुंना भोजन

आजारी भिक्खुंना भोजन

सुश्रुषा करणा-या भिक्खुंना भोजन

आजारी भिक्खुंना औषधी पुरविणे

भिक्खु संघाला खीर दान करणे

भिक्खुणीला स्नानाकरीता चीवर देणे

ह्या आठ वरांच्या बुध्द अनुमतीनंतर

बुध्दांना तु सांगितलेली कारणे

तुझी प्रसन्नता - तुझा आनंद 

तुझी शांती - तुझी सुख तृप्ती अनुभुती

हृदयाला मिळणारी शांती

श्रध्दा - बल नैतिक सामर्थ 

सप्त संबोधी अंग प्राप्ती

आठ वर मागण्याचा तुझा पावन उद्देश

आणि बुध्दानी केलेले पुण्यानुमोदन

हा एक इतिहास झालेला आहे....

हे विशाखा मिगार माते

श्रावस्ती नगरीतील तुझी दानशीलता

तुझ्या बुध्दीज्ञान कौशल्याची धार

तुझे घर प्रंपच सांभाळ कौशल्य

तु संघाला दिलेले पुर्वाराम विहार दान

उपासिकात दानशील होण्याचा पहिला मान

तुझा संघाला असलेला मदतीचा हात

तुझी करुणा - तुझे प्रेम वात्सल्य

तुझे धैर्य - चिकाटी - त्याग - समर्पण 

तुझे नैतिक चारित्र्य

ह्या संदर्भात शब्द ही अपुरे आहेत

बुध्द धम्म मिशन करीता

श्रावस्ती नगरी पासुन 

ब-याच ऐतिहासिक बुध्द स्थळांना

माझ्या बरेचदा भेटी झालेल्या आहेत

तेव्हा प्राचीन बुध्द इतिहास

आपले शब्द मला बयान करीत असतो

प्राचीन बुध्द इतिहासात मी रममाण होतो

तुझ्या गुणशीलतेचा आज शोध घेतो तेव्हा

मी पुर्णत: अबोल झालेला असतो

विशाखा मिगार माता पुन्हा होणे नाही

तुझ्या श्रावस्ती नगरीला

महान दानशील अनाथ पिंडक

डाकु अंगुलीमाल ह्यांचे अहिंसक होणे

राजकुमार जेत ह्यांचे जेतवन

जेतवनातील सुवर्ण मुद्रा व्यवहार

बुध्दांच्या पंचवीश भेटींचा

असा बराच मोठा इतिहास आहे

तेव्हा आता फक्त नतमस्तक होणेच

आमच्या हातामध्ये शेष आहे

तरी पण एकदा तु आमची आई व्हावी

तुझी करुणा शील मैत्री

तुझे प्रेम वात्सल्य मिळण्याची इच्छा 

आमची नेहमीचीचं राहाणार आहे

हे विशाखा मिगार माते !

हे विशाखा मिगार माते !!

हे विशाखा मिगार माते !!!


------------------------------------------

▪️ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

       नागपूर दिनांक २४ जुन २०२६

No comments:

Post a Comment