Friday, 13 February 2026

 🌹*आई रमाई....!*

    ‌‌ *डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

     मो.न. ९३७०९८४१३८


आई रमाई 

तुझ्या स्व-वेदनांचा

दु:खाचा इतिहास डोंगर

हा खुप मोठा आहे 

राजरत्न बाळाचे जाणे

आणि खिशात दमडी नाही

बाबांची द्विधा मनस्थिती

तु जाणनारी डॉक्टर झालीस

आई, तु दारिद्री भांडवल

कधीही केले नाहीसं

लुगड्याचा पदर फाडुन

कफनाची तजबीज करुन

परिवाराची लाज राखलीसं...

आमचे बाबा

उच्च शिक्षण घेण्यास

विदेशात गेले असतांना

अगदी भल्या पहाटे

तु शेण गोळा करण्यास

आणि गोव-या थापण्यास

घरा बाहेर जात होतीस गं

अर्ध उपाशी पोटी राहतांना

मिळणारा तो घामाचा पैसा

बाबांच्या शिक्षणाला

तु पाठवित होतीस

आणि अश्या परिस्थितीत 

तुझ्या गोंडस बाळाने 

जगाचा निरोप घेतला

ही गोष्ट बाबांना लपवितांना

शिक्षणात खंड होवु नये

हा तुझा उदात्त विचार

तु हृदयावर ठेवलेला दगड

मला असह्य करुन जातो...

बाबा गोलमेज परिषदेला

विदेशात जात असतांना

बोटींपर्यंत सोडायला आलीस

जनसागरांचा निरोप

तुझ्या नयनी आलेले अश्रु

बाबासाहेबांचे तुझे नावे पत्र

तुझ्या प्रेमाचा सागर

हा असंख्य जन मनांचा

राजा झाला तेव्हा

बाबांच्या सत्काराला जाण्यास

घालायला नविन लुगडे नाही

म्हणुन तु काही बहाणा करुन

बाबा सोबत गेली नाहीसं

आणि बाबा गेल्यावर

छत्रपती शाहु महाराजांनी

बाबांना दिलेला पागोटा घालुन

दुरूनचं सत्कार बघत होतीसं

माते, तु इतकी मन ऊर्जा

कुठुन आणली होतेस गं...

आई, तुझ्या सौंदर्याची गाथा

आणि प्रेमाचा इतिहास

लिहिण्यास माझ्याकडे 

शब्दांचे भांडार नाही गं

माझी ती लायकी ही नाही

तुझ्या चरण धुळी एवढी

तुझ्या प्रेम त्याग समर्पणाला

आजची लेक असो वा लेकी

ह्या विसरुन गेल्या आहेत

केवळ पोवाडे गायिले जातात

आजची ही पिढी

कुणी फॅशनमध्ये मस्त आहे 

कुणी आलिशान राहाणीत

कुणी साधना करण्यात

कुणी फसवणुक करण्यात

कुणी वेश्या राजकारणात 

तर कुणी वेगवेगळ्या गैर मार्गात

ती कल्पनाचं न केलेली बरी

तुझ्या प्रेम सागरांनी

दिलेला बुध्दाचा धम्म वसा

केवळ पुस्तकात बंदिस्त आहे

आजच्या ह्या बाजारु जगात !!!


-------------------------------

*डॉ. मिलिन्द जीवने 'शाक्य'*

नागपूर दिनांक १३ फेब्रुवारी २०२६

No comments:

Post a Comment